सगळ्यांना सुट्टी मिळाली कोरोना नावाचा राक्षस सगळ्यांसाठीच विश्रांतीचं गिफ्ट घेऊन आला सगळे निवांत झाले शाळेतला गोंगाट ऑफिसमधिल लगबग रस्त्यावरची वरदळ चाळीतली गडबड कामावर जाण्याची धांदल मंदिरातली आरती मशिदीतली नमाज सगळं सगळं बंद झालं बंद झालं नाही फक्त स्वयंपाक घरातलं दार ते सुरूच असतं कुठलाही व्हायरस ते बंद नाही करू शकत तिच्या पाचवीलाच पुजलय ते आज सगळे स्वस्त बसलेत पण ती आज ही विचारतेय तिचा तो भाबडा प्रश्न... काय हो, आज कुठली भाजी करू संजय सकटे
गजल
रुते खोल काटा जसा बाभळीचा
तसा वार झाला तुझ्या पापणीचा
कितीदा विझवले दिवे आठवांचे
तरी धूर होतो किती... काजळीचा
उघडताच डोळे अजुन पाहतो मी
पुसट चेहरा का तुझा... घातकीचा
तुझी काळजी घेत होतो सखे पण
तुला वाटलो मी गडी..... चाकरीचा
असर होत आहे तुझ्या... वेदनांचा
मला छंद जडला गझल, लेखणीचा
उमलल्या जुन्या वेदना काळजाच्या
जसा गंध आला कुण्या. पाकळीचा
सुई एवढा राग होता तुझा.. पण
जणू भासला हा विळा कापणीचा
नको जिंकल्याचा असा आव आणू
सखे हारलो मी तुझ्या... वाटणीचा
कशाला करू लाड इतके नभाचे
कुठे मोह आहे मला.. चांदणीचा
संजय सकटे
अकलूज

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा